देऊळगाव राजा प्रतिनिधी: मुन्ना ठाकूर
लुटप्रकरणी ५ आरोपी जेरबंद; ९३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
देऊळगाव राजा (प्रतिनिधी) – शहरातील बायपास रोडवर मध्यरात्री वाहन अडवून एका इसमाकडून रोख रक्कम व मोबाईल लुटल्याच्या घटनेचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पथकाने पाच आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत ९३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एलसीबीच्या तत्पर व अचूक तपासामुळे गुन्ह्याचा उलगडा अल्पावधीत करण्यात आला.
सदर घटना २४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे १ वाजताच्या सुमारास घडली होती. पाच जणांनी बायपास रोडवर एका इसमाची गाडी अडवून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल लुटल्याची तक्रार नोंद होताच देऊळगाव राजा पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. ४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड (बुलढाणा) व अपर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर यांच्या सूचनेनुसार एलसीबी पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे देऊळगाव राजा शहरातून पाच आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे –
१) विशाल सुरेश शेळके (वय २२, अमृत नगर)
२) भावेश दिलीप कासारे (वय २३, जुना जालना रोड)
३) आदित्य उर्फ छोट्या सुभाष पाखरे (वय २१, आंबेडकर नगर)
४) बादल भगवान घुगे (वय २८, दुर्गापुरा)
५) रितेश गजानन घुगे (वय २२, भगवान बाबा नगर)
पोलिसांनी आरोपींकडून ९३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत एलसीबी पथकातील HC दिगंबर कपाटे, HC राजू आडवे, PC मनोज खरडे, PC ऋषिकेश खंडेराव तसेच PSI राजकुमार कांबळे यांनी मोलाची भूमिका बजावली.
एलसीबीच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार असून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा पोलिसांचा निर्धार पुन्हा अधोरेखित झाला आहे.






