छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
टिटवी–पळसखेडा शिवारातील कोल्हापूर बंधाऱ्याचे काम आता दर्जेदार
सोयगाव तालुक्यातील टिटवी–पळसखेडा येथील शिवारात गट क्रमांक ३९/२ मध्ये जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामाबाबत दि. ५ मार्च २०२६ रोजी लोक सेवा पोर्टल न्यूज मध्ये बातमी प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदारांनी तात्काळ दखल घेत कामात आवश्यक त्या सुधारणा केल्याचे समोर आले आहे. यानंतर सध्या बंधाऱ्याचे काम मंजूर ईस्टिमेटनुसार व दर्जेदार पद्धतीने सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच कामाच्या ठिकाणी दिशा फलकही लावण्यात आला आहे.
या कामाबाबत काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली होती. त्यानंतर या संदर्भातील माहिती लोक सेवा पोर्टल न्यूजमधून प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर बातमी प्रसिद्ध होताच ठेकेदारांनी याची गांभीर्याने दखल घेत बांधकामाच्या पद्धतीत सुधारणा करून चांगल्या दर्जाच्या साहित्याचा वापर सुरू केल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
सध्या बंधाऱ्याच्या बांधकामामध्ये आवश्यक त्या प्रमाणात रेती, खडी व काँक्रीटचा वापर करून मजबूत पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, हा कोल्हापूर बंधारा पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना पाणीसाठा उपलब्ध होऊन शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे. पावसाळ्यात पाणी अडवून शेतीला दिलासा देणारा हा प्रकल्प ठरणार असल्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
ठेकेदाराकडून हे काम मंजूर ईस्टिमेटनुसार व शासनाच्या नियमांनुसार पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले असून लवकरच बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.







