छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे आज (दि. …) रात्री ठीक ८ वाजता अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसभाऊ मुलतानी यांच्या जाहीर सभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा फर्दापूर जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार माहीन इद्रिस मुलतानी तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार उत्तम महारु चव्हाण व राहुल राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली आहे.

या जाहीर सभेत इद्रिसभाऊ मुलतानी हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या निवडणुकीत मतदारांनी सजग राहून योग्य उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन केले जाणार आहे. विकास, रोजगार, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत सुविधांबाबत ठोस आराखडा मांडत मतदारांशी थेट संवाद साधला जाणार आहे.
दरम्यान, अधिकृत पंचायत समिती उमेदवार राहुल राठोड यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक तसेच ग्रामस्थांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. “फर्दापूर परिसराच्या विकासासाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार असून, परिवर्तनाची सुरुवात याच सभेतून होणार आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी व समर्थक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी सभेच्या तयारीला वेग दिला असून, फर्दापूर व परिसरात प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. आज होणाऱ्या या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






