देऊळगाव राजा : मुन्ना ठाकूर
आडगावराजा ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई डोंगरे अपात्र
सरपंच व उपसरपंच झोरे यांचे प्रशासनाला सहकार्य
सिंदखेड राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील आडगावराजा ग्रामपंचायतीच्या हद्दीत शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रकरणात प्रशासनाने कडक कारवाई करत ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई भागाजी डोंगरे यांना अपात्र ठरवले आहे. अप्पर जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 14 (1)(ज-3) अंतर्गत हा अंतिम आदेश दिला.
चौकशीत लक्ष्मीबाई डोंगरे यांचे पती भागाजी डोंगरे यांनी ग्रामपंचायत मालकीच्या सार्वजनिक रस्त्यालगत सुमारे 100 फूट लांब व 9 फूट रुंद पक्की भिंत उभारून अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले. अतिक्रमण न हटवल्याने सदस्य अपात्र ठरल्याचा ठपका सिद्ध झाला.
सचिव ग्रामपंचायत व पंचायत समिती सिंदखेड राजा यांच्या अहवालानुसार हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात सरपंच व उपसरपंच झोरे यांनी प्रशासनाला आवश्यक कागदपत्रे व माहिती देत सहकार्य केल्याचे आदेशात नमूद आहे.
या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या Janabai विरुद्ध Additional Commissioner या निकालाचा आधार घेण्यात आला आहे. या आदेशामुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अतिक्रमण प्रकरणात पुढील कारवायांचे संकेत मिळत आहेत.






