Home / Uncategorized / तोरणाळ्यात शेतकऱ्याच्या घरातून तूर चोरी अज्ञात चोरट्यांचा धाडसी डाव; 58,800 रुपयांचा मुद्देमाल लंपास !

तोरणाळ्यात शेतकऱ्याच्या घरातून तूर चोरी अज्ञात चोरट्यांचा धाडसी डाव; 58,800 रुपयांचा मुद्देमाल लंपास !

जामनेर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

पोर्चमधील तूर गायब; फत्तेपूर हद्दीत चोरट्यांचा उच्छाद — शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाला!

सलग चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत; पोलीस यंत्रणेपुढे मोठे आव्हान!

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात शेतकऱ्यांना लक्ष्य करत सुरू असलेल्या चोरीच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले असून, फत्तेपूरजवळील तोरणाळे गावात शेतकऱ्याच्या घरातून तूर चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तोरणाळे येथील शेतकरी विष्णू धुमसिंग पाटील यांची अनाड (ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) शिवारात गट क्रमांक 20 मध्ये सुमारे चार एकर शेती आहे. यंदा कपाशी व तूर पिकाची लागवड केली होती. काढणीनंतर सुरक्षिततेच्या उद्देशाने तूर त्यांच्या तोरणाळे येथील घराच्या पोर्चमध्ये साठवून ठेवण्यात आली होती.
दिनांक 02 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कुटुंब झोपण्यासाठी घरात गेले असता, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संधी साधत पोर्चमधील तूर लंपास केली. सकाळी 03 फेब्रुवारी रोजी साडेसहाच्या सुमारास उठल्यानंतर चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
या घटनेत १२ कट्टे तूर (एकूण ८ क्विंटल ४० किलो) चोरीस गेले असून, अंदाजे बाजारभावानुसार याची किंमत ५८ हजार ८०० रुपये इतकी आहे. शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर चोरट्यांनी घाला घातल्याने पाटील कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला आहे.
या प्रकरणी फत्तेपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरोधात बी.एन.एस. 2023 कलम 303(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद राठोड, पोलीस अमलदार प्रवीण चौधरी यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व स्थानिक माहितीच्या आधारे तपास सुरू असून, लवकरच आरोपींचा शोध घेण्यात येईल, असे सपोनि प्रमोद कोठारे यांनी सांगितले.
दरम्यान, फत्तेपूर व तोरणाळे परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, रात्रीच्या वेळी शेतमाल सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी व चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार