छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
‘धनुष्यबाण’वर मतदानाचे आवाहन; सावळदबाऱ्यात आमदार अब्दुल सत्तार यांची जाहीर सभा उत्साहा
सावळदबारा येथे फर्दापूर गटाचे शिवसेना उमेदवार प्रभावती चव्हाण यांच्या प्रचारार्थ आमदार अब्दुल सत्तार यांची जाहीर सभा संपन्न
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. ही सभा शिवसेना जिल्हा परिषद फर्दापूर गटाच्या अधिकृत उमेदवार प्रभावती दारासिंग चव्हाण तसेच सावळदबारा पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार राधेश्याम जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती.
या जाहीर सभेत बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारांना उद्देशून जोरदार आवाहन केले. ते म्हणाले की, शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या अधिकृत निवडणूक चिन्हावर मतदान करून प्रभावती दारासिंग चव्हाण आणि राधेश्याम जाधव यांना प्रचंड मतांनी विजयी करा. विकासकामांना गती देण्यासाठी सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची गरज असून शिवसेनेचे उमेदवार ही जबाबदारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार सत्तार पुढे म्हणाले की, प्रभावती दारासिंग चव्हाण यांनी आतापर्यंत सोयगाव तालुका व सावळदबारा परिसरात विविध विकास योजना राबवून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून त्यामुळेच त्यांचा राजकीय क्षेत्रात ठसा उमटला आहे. विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या उमेदवारांना जनतेने साथ द्यावी, असेही त्यांनी नमूद केले.
या सभेला सोयगाव, फर्दापूर व सावळदबारा परिसरातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या जाहीर सभेची माहिती देताना माजी सभापती तथा सोयगाव तालुका प्रमुख धरमसिंग दारासिंग चव्हाण यांनी सांगितले की, सावळदबारा परिसरात शिवसेनेच्या उमेदवारांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना निश्चितच मोठ्या मताधिक्याने विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






