छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा गणात पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महाविकास आघाडीला मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. आनंद नेमीचंद जाधव यांना गावागावांतून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून प्रचारात आघाडी पुढे असल्याचे बोलले जात आहे.
गाव जनसंपर्क दौऱ्यानिमित्त केलेल्या भेटींमध्ये तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या जनतेच्या प्रेमाबद्दल उमेदवार आनंद जाधव यांनी सर्व मायबाप जनतेचे मनापासून आभार मानत, हेच प्रेम व आशीर्वाद कायम राहावेत, अशी भावना व्यक्त केली.
महाविकास आघाडीअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडी यांची एकजूट दिसून येत असून फर्दापूर गटातून देवकाबाई राठोड यांना अधिकृत पसंती जाहीर करण्यात आली आहे. या एकत्रित ताकदीमुळे आघाडीच्या प्रचाराला अधिक वेग मिळाला असून विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे.
पंचायत समिती उमेदवार आनंद नेमीचंद जाधव यांची निवडणूक निशाणी ‘तुतारी’ असून, “सांगा सांगा सर्वांना, आपले मत तुतारीला” हा नारा सध्या गावागावांत घुमत आहे. प्रचार सभा, मतदार संवाद व बैठकींना नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी बोलताना डॉ. इंद्रजित सोळंके (फर्दापूर) यांनी मतदारांना आवाहन केले की, गुरुवार दि. ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणाऱ्या मतदानात सर्व मतदारांनी आपला हक्क बजावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ‘तुतारी’ निशाणीवर मतदान करून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे.
दरम्यान, सावळदबारा गणात सुरू असलेल्या जोरदार प्रचारामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी जिल्हा अध्यक्ष रंगनाथ नाना (नानाशो) यांच्यासह कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.






