मेहकर प्रतिनिधी:विजय चव्हाण
देऊळगाव माळी येथून लोककलावंतांची भव्य पदयात्रा
महाराष्ट्रातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील लोककलावंत व दिव्यांग कलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने दिनांक २७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव माळी येथून बुलढाणा पर्यंत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या पदयात्रेमध्ये जिल्ह्यातील गावागावातील लोककलावंत आपापल्या पारंपारिक वाद्य, साहित्य व वेशभूषेसह मोठ्या संख्येने सहभागी होणार असून लोककलेच्या माध्यमातून आपला आक्रोश व्यक्त करणार आहेत. लोककलावंतांच्या अनेक मागण्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दीर्घकाळापासून प्रलंबित असून, त्याबाबत प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने सादर करूनही लोककलावंत तसेच वृद्ध लोककलावंतांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सन २०२३ पासून कार्यकारणी गठीत नसल्यामुळे लोककलावंतांच्या मागण्या व वृद्ध कलावंतांचे मानधन रखडलेले आहे, यामुळे कलावंतांमध्ये तीव्र नाराजी आहे.
या सर्व अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठीच राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग संघर्ष समितीच्या वतीने पदयात्रा व आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्तरातील व सर्व क्षेत्रातील कलावंतांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संदीप कुमार बोरकर यांनी केले आहे.






