छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांच्या हस्ते सत्तार सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेशामुळे सत्तार सेनेला मोठा राजकीय धक्का बसला असून संघटनात्मक पातळीवर मोठी गळती लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पक्षप्रवेश कार्यक्रमात गुलाब टेलर, गणेश झामा राठोड, रोहिदास नरसिंग राठोड, तेजराव बाबुलाल राठोड, दीपक अवचार, मिलिंद तायडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी झाले. तसेच हिरा बाळु चव्हाण यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली.
यावेळी बोलताना अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी यांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती देत, “भाजप हा सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा पक्ष असून प्रत्येक समाजघटकाला न्याय देण्याचे काम पक्ष सातत्याने करत आहे,” असे सांगितले.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सत्तार सेनेतील अंतर्गत नाराजी, दिशाहीन नेतृत्व आणि कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. भाजपच्या सक्षम नेतृत्वाखाली जनतेसाठी काम करण्याची संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या पक्षप्रवेशाबाबत बोलताना प्रा. जीवन कोलते पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांनी सांगितले की, “सत्तार सेनेतील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने सत्तार सेनेच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी काळात आणखी अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतील,” असा दावा त्यांनी केला.
या घडामोडींमुळे संबंधित परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून भाजपचे संघटन अधिक मजबूत झाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.






