मनोरा | प्रतिनिधी – सुधीर ढगे
राष्ट्रीय मतदार “राजा जागा हो” अभियानांतर्गत मनोरा शहरात शालेय विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी “मतदान राजा जागा हो” अशा घोषणांनी संपूर्ण मनोरा नगरी दणाणून सोडली.
या जनजागृती मोहिमेदरम्यान सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची तपासणी करण्याबाबत जनतेला माहिती देण्यात आली. तसेच नवीन मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती तसेच आपल्या पाल्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.
विद्यार्थी व शिक्षक बांधवांनी नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देत, लोकशाही व संविधानाचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगितले. प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.






