Home / Uncategorized / अवैध मुरूम उत्खनन पकडूनही कारवाई शून्य; महसूल अधिकाऱ्यांवर संशयाचे सावट

अवैध मुरूम उत्खनन पकडूनही कारवाई शून्य; महसूल अधिकाऱ्यांवर संशयाचे सावट

 

सिंदखेड राजा :मुन्ना ठाकूर 

सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन (माळ परिसर) येथे दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास सुरू असलेले अवैध मुरूम उत्खनन महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले असतानाही, पुढील कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आडगाव राजा-सावखेड तेजन माळ परिसरात सुरू असलेल्या या अवैध उत्खननात दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी मशीनचा वापर सुरू होता. विशेष म्हणजे, सदर वाहने अडविण्यात आली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले असूनही पंचनामा, जप्ती किंवा कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.
दिनांक 20 जानेवारी रोजी महसूल विभागाकडे विचारपूस केली असता, कोणतीही अधिकृत नोंद किंवा कारवाई झाल्याचे आढळून आले नाही. तहसीलदार कार्यालयाकडून उडवा-उडवीची, समाधानकारक नसलेली उत्तरे देण्यात आल्याने संशय अधिक बळावला आहे.
या संपूर्ण प्रकारात आर्थिक देवाण-घेवाण करून प्रकरण दाबले गेल्याचा गंभीर आरोप करण्यात येत असून, शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविण्यात आल्याचा दावा केला जात आहे. कर्तव्य बजावण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे बेकायदेशीर उत्खननाला अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
या पार्श्वभूमीवर श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव गड किल्ले ऐतिहासिक वास्तू संवर्धन प्रतिष्ठान, आडगाव राजा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांच्याकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे. तक्रारीत सदर प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, तसेच शासनाचा बुडालेला महसूल वसूल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लेखी आदेश व कारवाई अहवाल देण्याची मागणी करण्यात आली असून, न्याय न मिळाल्यास न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार