‘अरुणोदय – सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान’ अंतर्गत १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान मोफत तपासणी मोहीम
सोयगाव | प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव व सावळदबारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सिकलसेल अॅनिमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांचा समन्वय अत्यंत आवश्यक आहे. या आजाराबाबत व्यापक जनजागृती, नियमित तपासणी आणि योग्य उपचारांची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांनी केले.
शासनाच्या आरोग्य धोरणांना पूरक ठरणारे ‘अरुणोदय – सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान’ हे समाजाच्या हितासाठी राबविण्यात येणारे अत्यंत महत्त्वपूर्ण अभियान असून, या मोहिमेच्या माध्यमातून दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत सिकलसेल तपासणी, समुपदेशन व उपचार सुविधा पोहोचविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. चावडा पुढे म्हणाले की, या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, आरोग्य यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी परस्पर समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतूनच सिकलसेलमुक्त, निरोगी व सक्षम समाजाची उभारणी शक्य आहे.
दि. १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत तालुक्यात सिकलसेल तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेंतर्गत ० ते ४० वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांनी सिकलसेल चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही तपासणी पूर्णतः मोफत असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
२०४७ पर्यंत भारत सिकलसेलमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प या अभियानामागील मुख्य उद्देश असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व स्तरांतून सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या अभियानात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे डॉ. गीतेश चावडा यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.






