जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सासरच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी; बारा तासांनंतर मृतदेह बाहेर
पहूर, ता. जामनेर : सासरच्या जाचाला कंटाळून ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना एकुलती (ता. जामनेर) येथे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. जिजाबाई देवानंद सकट असे मृत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सासरचा जाच असह्य झाल्याने जिजाबाई सकट यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत उडी घेतली. विहिरीत पाणी असल्याने त्यांचा मृतदेह तातडीने बाहेर काढणे शक्य झाले नाही. पंपाद्वारे विहिरीतील पाणी उपसल्यानंतर तब्बल बारा तासांनी मृतदेह बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, याप्रकरणी मयत जिजाबाई यांच्या आई इंदुबाई रघुनाथ चंदनशिव (रा. ढालसिंगी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती देवानंद युवराज सकट व सासरा युवराज सुखदेव सकट यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मृतदेहाचे पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास सपोनि प्रवीण दातरे याच्या मार्गदशानाखाली पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंबरे करीत आहेत.
मयत जिजाबाई यांच्या पश्चात दोन मुले आहेत. आईचे छत्र बालपणीच हरपल्याने दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






