छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
अचलपूरच्या सपना पुजारी महिला भजनी मंडळाने पटकावला प्रथम क्रमांक; सावळदबाराच्या योगिता पाटील मंडळाला द्वितीय क्रमांक
सावळदबारा : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिरात चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह भव्य महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिला भजनी मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या भजन स्पर्धेने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिराचे पुजारी यांच्या वतीने मंदिर परिसरात महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराचे पुजारी राहुल गोविंदा पुजारी यांनी स्पर्धेसाठी आकर्षक व भव्य बक्षिसांची घोषणा केली होती. या स्पर्धेत विविध महिला भजनी मंडळांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत अचलपूर येथील सपना पुजारी महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर सावळदबारा येथील योगिता पाटील महिला भजनी मंडळाने द्वितीय क्रमांक मिळविला. विजेत्या मंडळांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.
अवतार दिनानिमित्त भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला होता. पहाटे देवाला मंगलस्नान घालून उटी करण्यात आली. तसेच भगवान चक्रधर स्वामींची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. यावेळी पुजारी मंडळी तसेच गावातील महिलांच्या वतीने भक्तांसाठी गोड पुरणपोळीचा प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत महिला भजन स्पर्धा रंगली. महिला भजनी मंडळांनी भक्तिगीते, अभंग आणि विविध धार्मिक भजनांचे सादरीकरण करून वातावरण भक्तिमय केले. उत्कृष्ट आवाज, तालबद्ध सादरीकरण आणि भक्तिभावाने सादर करण्यात आलेल्या भजनांना उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे सावळदबारा परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. महिला भजन स्पर्धेच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले, तसेच धार्मिक परंपरा आणि भक्तीचा जागर करण्यात आला.
भगवान श्री चक्रधर स्वामी जयंती व अवतार दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आल्याची माहिती मंदिराचे पुजारी राहुल गोविंदा पुजारी यांनी दिली.






