चिखली : प्रतिनिधी
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत मिळणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत एका महिलेने चिखली तहसील कार्यालयात तांदूळ फेकून निषेध नोंदविल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने दाखवलेल्या तांदळात मोठ्या प्रमाणात चुरी असल्याचे दिसून आले. मात्र, संबंधित तांदूळ नेमका कोणत्या रास्तभाव दुकानातून घेतला, याबाबत महिलेने स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे या धान्याचा स्रोत आणि गुणवत्ता याची अधिकृत तपासणी होणे आवश्यक आहे.
महिलेने दाखवलेल्या तांदळापैकी जवळपास ७० ते ८० टक्के भाग चुरीसदृश असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकारामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीतून नागरिकांना वितरित होणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
या घटनेनंतर पत्रकारांनी संबंधित महिलेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, तिने आपले नाव नंतर सांगणार असल्याचे नमूद केले. तसेच हा तांदूळ कोणत्या रास्तभाव दुकानातून घेतला, याबाबत विचारणा केली असता संबंधित दुकानदार कोण आहे, याची माहिती नसल्याचे तिने सांगितले. आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीने तो तांदूळ घेतला असल्याचेही तिने नमूद केले. आपण अद्याप रेशनचा माल घेतलेला नसल्याचेही महिलेने स्पष्ट केले.
त्यामुळे संबंधित तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीतीलच आहे का, तो कोणत्या दुकानातून आणला गेला आणि त्याची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार आहे का, याबाबत सध्या निश्चित निष्कर्ष काढता येत नाही. संबंधित तांदळाचा नमुना घेऊन अधिकृत तपासणी केल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.
सार्वजनिक वितरण प्रणालीतून धान्य वितरित करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची असते. त्यामुळे केवळ नागरिकांकडून तक्रार आल्यानंतरच नव्हे, तर शासनानेही वितरण होत असलेल्या धान्याची नियमितपणे गुणवत्ता तपासणी करणे आवश्यक आहे. धान्याचा दर्जा निकषांनुसार असल्याची खात्री करूनच ते लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
विशेषतः नागरिकांच्या अन्नाशी संबंधित असल्याने धान्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार आल्यास संबंधित नमुने तपासणीसाठी घेऊन त्याचा अहवाल सार्वजनिक करणे, तसेच दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करणे आवश्यक ठरते.
तक्रारीची दखल घेणार
“संबंधित व्यक्तीची तक्रार आम्ही गांभीर्याने घेतली असून, यासंदर्भातील माहिती वरिष्ठांना कळविण्यात येईल. भविष्यात धान्य पुरवठा सुरळीत राहून नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य मिळण्यासाठी योग्य तो प्रयत्न केला जाईल,” अशी माहिती पुरवठा निरीक्षक प्रियंका सोनूकुसळे यांनी दिली.
दरम्यान, संबंधित महिलेने या घटनेबाबत तहसीलदारांकडे लेखी निवेदन दिले आहे किंवा नाही, याची बातमी तयार होईपर्यंत अधिकृत पुष्टी होऊ शकली नाही. त्यामुळे तांदळाचा नमुना अधिकृत तपासणीसाठी घेतला जातो का आणि तपासणीत त्याची गुणवत्ता काय आढळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.






