जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने विद्यापीठ क्षेत्रातील ‘उत्कृष्ट क्रीडा संचालक पुरस्कार’ मु. जे. महाविद्यालयाचे वरिष्ठ क्रीडा संचालक तथा एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जळगाव जिल्हा क्रीडा संघटनांचा महासंघ तसेच जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभात जळगाव जिल्हा क्रीडा संघटनांचा महासंघाचे अध्यक्ष तथा आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी क्रीडा क्षेत्रातील विविध पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, प्राध्यापक तसेच क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी अनेक वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान दिले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे, खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन तसेच खेळाडूंना उच्च स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले.
एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी म्हणूनही त्यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी व खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली. क्रीडा क्षेत्रातील त्यांचे कार्य, शिस्तबद्ध नियोजन आणि खेळाडूंप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट क्रीडा संचालक पुरस्कार जाहीर झाल्याने क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी प्रा. डॉ. बेलोरकर यांच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही त्यांनी क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व खेळाडूंना मार्गदर्शन करून जळगावच्या क्रीडा क्षेत्राला अधिक उंचीवर नेण्यासाठी योगदान द्यावे, अशा शुभेच्छा दिल्या.
सत्कार समारंभास राजेश जाधव, प्रशांत कोल्हे, डॉ. पी. आर. चौधरी, प्रा. इकबाल मिर्झा, प्रशांत जगताप, डॉ. रणजित पाटील, प्रा. हरीश शेळके, निलेश पाटील, सचिन महाजन, योगेश सोनवणे, जितेंद्र शिंदे, विजय विसपुते, नरेंद्र भोई यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. रणजित पाटील यांनी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. विद्यापीठाकडून मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या आजवरच्या कार्याची पोचपावती असून, जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल महाविद्यालयीन विद्यार्थी, खेळाडू, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






