Home / Uncategorized / बनावट गावठी दारू निर्मिती-विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई…

बनावट गावठी दारू निर्मिती-विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

देव्हारीच्या मुनीर तडवीला एक वर्षासाठी अकोला कारागृहात स्थानबद्ध; फर्दापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

फर्दापूर : फर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देव्हारी (ता. सोयगाव) येथे बनावट गावठी हातभट्टी दारूची निर्मिती करून चोरट्या पद्धतीने विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पोलिसांनी अखेर एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे. मुनीर बाबू तडवी (वय ५५, रा. देव्हारी, ता. सोयगाव) याला महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आदींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी असलेल्या एमपीडीए अधिनियम १९८१ च्या कलम ३(१) अन्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. दिनांक ७ ऑगस्ट रोजी त्याच्यावर स्थानबद्धतेचा आदेश बजावून त्याची जिल्हा कारागृह, अकोला येथे रवानगी करण्यात आली.

जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव यांनी कठोर भूमिका घेतली असून, कायद्याची पायमल्ली करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार फर्दापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

मुनीर तडवी हा आडदांड व गुंड प्रवृत्तीचा असून, कायद्याची भीती न बाळगता सार्वजनिक ठिकाणी नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून त्या दहशतीच्या जोरावर गावठी हातभट्टी दारूचा बेकायदेशीर व्यवसाय करीत असल्याची पोलिसांची नोंद आहे. त्याच्याकडून तयार करण्यात येणाऱ्या बनावट गावठी दारूमध्ये घटकांचे निश्चित प्रमाण नसल्याने ती मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. त्यामुळे देव्हारी तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन सामाजिक वातावरणावरही विपरीत परिणाम होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दहा गुन्हे दाखल; प्रतिबंधात्मक कारवाईचाही परिणाम नाही

मुनीर तडवी याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५ (फ) अन्वये तब्बल दहा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ९३ अन्वये त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवायांचा कोणताही परिणाम न होता त्याने अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करणे आवश्यक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांकडून प्रस्ताव; जिल्हाधिकाऱ्यांचा स्थानबद्धतेचा आदेश

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि फर्दापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने मुनीर तडवी याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडे सादर करण्यात आला.

प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी ६ ऑगस्ट २०२६ रोजी मुनीर बाबू तडवी याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम १९८१ च्या कलम ३(१) अन्वये स्थानबद्धतेचा आदेश पारित केला. त्यानंतर ७ ऑगस्ट २०२६ रोजी आदेशाची अंमलबजावणी करून त्याला जिल्हा कारागृह, अकोला येथे स्थानबद्ध करण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत काइंगडे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा विजयसिंह राजपूत आणि फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस हवालदार दिपक सुरोशे, सहाय्यक फौजदार छाया नगराळे, पोलीस बीट जमादार मिरखा तडवी, पोलीस नाईक निलेश लोखंडे, पोलीस अंमलदार फिरोज तडवी, पांडुरंग ठाकरे, आकाश गबळे आणि सागर डहाके यांनी सहभाग घेतला.

अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीसारख्या गंभीर प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या या कठोर कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कारवाईबाबत समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार