Home / Uncategorized / सनातन संस्कृतीचे जतन आणि धर्मजागृती ही काळाची गरज” – युवाचार्य श्री विवेक दासजी शास्त्री महाराज…!

सनातन संस्कृतीचे जतन आणि धर्मजागृती ही काळाची गरज” – युवाचार्य श्री विवेक दासजी शास्त्री महाराज…!

 लोक महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी:

भोकरदन, दि. ५ ऑगस्ट : श्री घृष्णेश्वर महादेव ज्योतिर्लिंग, वेरूळ येथून प्रारंभ झालेल्या चौथ्या सनातन कलश यात्रेचा दुसरा दिवस भक्तिभाव, उत्साह आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. ही यात्रा आज फुलंब्री येथून प्रारंभ होऊन सिल्लोड येथे पोहोचली. येथे ए.के.सी. इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या वतीने धर्मजागृती कार्यक्रम तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर यात्रा भोकरदन येथे दाखल झाली असून संत गजानन हॉटेल वारकरी हाॅटेल येथे रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली.

यात्रेचे विविध ठिकाणी सनातन धर्मप्रेमी, शिवभक्त, माता-भगिनी आणि युवकांनी पुष्पवृष्टी, हर हर महादेवच्या जयघोषात उत्स्फूर्त स्वागत केले. विशेषतः भोकरदन शहरात मोठ्या संख्येने नागरिकांनी यात्रेत सहभागी होत सनातन धर्माविषयीची आपली श्रद्धा आणि बांधिलकी व्यक्त केली.

यावेळी काशी-वाराणसी येथून पधारलेले आंतरराष्ट्रीय कथावाचक, श्री शिवमहापुराण कथाप्रवचक, युवाचार्य श्री विवेक दासजी शास्त्री महाराज (श्री धाम वृंदावन) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “सनातन कलश यात्रा ही केवळ धार्मिक यात्रा नसून भारतीय संस्कृती, अध्यात्म, परंपरा आणि धर्मजागृती जनमानसात रुजविण्याचे प्रभावी माध्यम आहे. आपल्या संस्कृतीचे रक्षण, गोसेवा, संतसेवा, देवस्थानांचे संवर्धन आणि धर्ममूल्यांचे जतन ही प्रत्येक सनातनीची जबाबदारी आहे. समाज धर्माशी जोडला गेला तर राष्ट्र अधिक सक्षम, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी बनते. आपल्या पुढील पिढीला धर्म, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची शिकवण देणे हीच खरी समाजसेवा आहे.”

महाराज पुढे म्हणाले की, भगवान महादेवांचा संदेश हा संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा संदेश आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथून आणलेले पवित्र जल रायरेश्वर महादेवांना अर्पण करणे म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सनातन परंपरेप्रती असलेली निष्ठा व्यक्त करण्याचा पवित्र सोहळा आहे.

या सनातन कलश यात्रेचे आयोजन श्री पुरुषोत्तम मापारी व सौ. वर्षा मापारी यांनी केले असून ही यात्रा सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी रायरेश्वर चिंचपूर (ता. मोताळा) येथील ग्रामस्थांचे उल्लेखनीय सहकार्य लाभत आहे.

यात्रा उद्या विदर्भाकडे प्रस्थान करणार असून धाड येथील सहकार विद्या मंदिर येथे रात्रीचा मुक्काम राहणार आहे. दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी श्री रायरेश्वर महादेव मंदिर, रायरेश्वर चिंचपूर येथे या यात्रेचा समारोप होणार असून श्री घृष्णेश्वर महादेव ज्योतिर्लिंग येथून आणलेल्या पवित्र जलाने भगवान रायरेश्वर महादेवांचा वैदिक मंत्रोच्चारात जलाभिषेक करण्यात येणार आहे. या समारोप सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार