Home / Uncategorized / नांदा तांडा येथील जिओ टॉवर ठरला ‘नावालाच’; रेंजअभावी नागरिक त्रस्त..

नांदा तांडा येथील जिओ टॉवर ठरला ‘नावालाच’; रेंजअभावी नागरिक त्रस्त..

 छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

एका महिन्याचे रिचार्ज करूनही सेवा ठप्प; विद्यार्थी, व्यापारी व ग्रामस्थांचे आर्थिक व मानसिक नुकसान – सरपंच वरदानसिंग चव्हाण

नांदा तांडा, ता. सोयगाव :

सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा येथे उभारण्यात आलेला जिओ मोबाईल टॉवर केवळ नावालाच असल्याची संतप्त भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. गावात मोबाईल नेटवर्क अत्यंत कमकुवत असल्याने नागरिकांना कॉल करणे, इंटरनेट वापरणे तसेच ऑनलाइन व्यवहार करणेही कठीण झाले आहे. दरमहा मोबाईल रिचार्जवर खर्च करूनही समाधानकारक सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

आजच्या डिजिटल युगात शिक्षण, बँकिंग, शासकीय सेवा, ऑनलाइन अर्ज, यूपीआय व्यवहार, आरोग्य सेवा आणि दैनंदिन संवादासाठी मोबाईल नेटवर्क अत्यावश्यक बनले आहे. मात्र नांदा तांडा येथे नेटवर्क नसल्याने विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास, परीक्षा अर्ज व शैक्षणिक माहितीपासून वंचित राहत आहेत. व्यापाऱ्यांना ऑनलाइन पेमेंट स्वीकारताना अडचणी येत असून ग्राहकांनाही व्यवहार करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गावातील अनेक नागरिकांना फोन करण्यासाठी किंवा इंटरनेट वापरण्यासाठी घराबाहेर, शेतात अथवा उंच ठिकाणी जावे लागत आहे. अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीतही संपर्क साधता येत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित कंपनीकडे तसेच अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप सरपंच वरदानसिंग चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर जिओ कंपनीने तांत्रिक बिघाड दूर करून नांदा तांडा येथे दर्जेदार नेटवर्क सेवा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा गावातील टावर काढून न्यावा अशा गंभीर इशारा सरपंच वरदानसिंग चव्हाण यांनी दिला आहे.

▪️सरपंच वरदानसिंग चव्हाण यांची प्रतिक्रिया :

“नांदा तांडा येथे जिओचा टॉवर उभारण्यात आला असला तरी गावात नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. नागरिक दरमहा रिचार्ज करूनही त्याचा कोणताही लाभ मिळत नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून जिओ कंपनीने तातडीने तांत्रिक पथक पाठवून समस्या कायमस्वरूपी सोडवावी. अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात येईल.

” – सरपंच वरदानसिंग चव्हाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार