छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
एकटी राहत असल्याचा गैरफायदा; आरोपी शेख रमजान पोलिसांच्या ताब्यात…
घटनेने सोयगाव तालुका हादरला; आरोपीस कठोर शिक्षेची नागरिकांची मागणी…

सोयगाव तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी जरंडी येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून एका ८० वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून समाजमन हादरले आहे. आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील एका गावात ही दुर्दैवी घटना घडली. पीडित वृद्ध महिला एकटी राहत असल्याचा गैरफायदा घेत शेख रमजान या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर पीडितेची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सपोनि पंकज बारवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी शेख रमजान याला ताब्यात घेतले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचे कामही सुरू आहे.
या अमानुष प्रकारामुळे संपूर्ण सोयगाव तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील विविध संघटना व नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि पंकज बारवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.






