जळगाव विश प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
जळगावकडे जात असताना दुपारी घडली दुर्घटना; भरधाव अवजड वाहनांवर कारवाईची नागरिकांची मागणी
पहूर, ता. जामनेर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील देव पिंपरी फाट्याजवळ सोमवारी (ता. २०) दुपारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात पाळधी येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत दुचाकीवर प्रवास करणारा दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या अपघातामुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली असून वाहतुकीवरही परिणाम झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश भगवान धनगर (वय ३३, रा. पाळधी) व पवन शिवाजी शेळके (वय २९, रा. पाळधी) हे दोघेही एमएच-१९ डीएस-१०२२ क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीवरून जळगावच्या दिशेने निघाले होते. दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ते देव पिंपरी फाट्याजवळ पोहोचले असता, एमएच-१९ सीएक्स-२८२६ क्रमांकाच्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात गणेश भगवान धनगर यांचा जागीच मृत्यू झाला, तर पवन शिवाजी शेळके गंभीर जखमी झाले. अपघातानंतर काही काळ घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. स्थानिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमीला रुग्णवाहिकेतून जळगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना केले.
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून अपघाताचा सखोल तपास सुरू केला आहे. डंपर चालकाची चौकशी सुरू असून निष्काळजीपणा आणि भरधाव वाहनचालना यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली.
या दुर्दैवी घटनेमुळे पाळधी गावावर शोककळा पसरली आहे. गणेश धनगर यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, देव पिंपरी फाटा परिसरातून अवजड वाहने मोठ्या वेगाने धावत असल्याने यापूर्वीही लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती नागरिकांनी दिली. या मार्गावर वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी करावी, अवजड वाहनांवर नियमित कारवाई करावी तसेच आवश्यक ठिकाणी गतिरोधक, इशारा फलक व वाहतूक नियंत्रणाची उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.






