(तालुका पैठण)छ. संभाजीनगर जिल्हा : प्रतिनिधी श्रीपत पवार.
मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे ३९ वे राष्ट्रीय अधिवेशन शारदा महाविद्यालय, परभणी येथे आयोजित करण्यात येणार असून या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी डॉ. शिवाजी यादव (शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड तालुका पैठण)यांची बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत व संमतीने करण्यात आली.
मराठवाडा अर्थशास्त्र परिषद ही मराठवाडा विभागातील अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास, संशोधन व प्रसारासाठी कार्यरत असलेली एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. परिषदेच्या माध्यमातून दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशने, चर्चासत्रे, संशोधन सादरीकरणे तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
डॉ. शिवाजी यादव हे अर्थशास्त्र विषयातील अभ्यासक, संशोधक व अनुभवी प्राध्यापक म्हणून परिचित आहेत. अध्यापन, संशोधन, विद्यापीठीय कामकाज तसेच विविध शैक्षणिक परिषदांमधील सक्रिय सहभागामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ३९ वे राष्ट्रीय अधिवेशन अधिक दर्जेदार, संशोधनाभिमुख व समाजोपयोगी ठरेल, असा विश्वास परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे.
निवडीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. शिवाजी यादव यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. मराठवाडा विभाग तुलनेने मागासलेला असल्याने “मराठवाड्यातील कृषी, उद्योग, रोजगार, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण व शाश्वत विकास यासारख्या समकालीन आर्थिक प्रश्नांवर अधिवेशनाच्या माध्यमातून सखोल व अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल खासदार मा. संदिपान पाटील भुमरे, आमदार मा.विलास बापू पाटील भुमरे, मा. राजू नाना पाटील भुमरे, जिल्हा परिषद सदस्य मा. शिवराज भैय्या पाटील भुमरे, प्राचार्य महासंघाचे कार्यकारिणी सदस्य डॉ. चंद्रसेन कोठावळे, डॉ. विलास खंदारे, डॉ. दिलीप अर्जुने, डॉ. भारत खंदारे, डॉ. सोनाजी पतंगे, डॉ. अर्जुन मोरे, डॉ. विश्वनाथ कोक्कर, डॉ. राम सोलंकर, डॉ. दिनकर टकले, डॉ. संतोष कुटे, डॉ. माधव शिंदे, डॉ.रमेश भालेराव, डॉ. सोमेश्वर बाबर, डॉ. अजय दीक्षित, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, डॉ. मारुती तेगमपुरे, डॉ. शिवाजी पाते, डॉ. राम शेवलीकर, यांच्यासह मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे सर्व जिल्हा प्रतिनिधी, परिषदेचे सर्व सदस्य, प्राध्यापक, संशोधक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. शिवाजी यादव यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी सर्वांनी मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेच्या आगामी अधिवेशनाबद्दल उत्सुकता व्यक्त केली.






