छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
रानटी जनावरांमुळे शेतकरी हवालदिल; वनविभागाने तातडीने पिंजरा लावून नुकसानभरपाई द्यावी – विनोद कोते
सोयगाव : सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात रानटी डुक्कर, निलगायी, हरणे आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर संकट कोसळले आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून ही रानटी जनावरे सोयाबीन, मका, कापूस व तूर पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस करीत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
सावळदबारा येथील शेतकरी तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका संघटक विनोद सुभाष कोते यांच्या गट क्रमांक ३०१ मधील शेतात रानटी डुकरांनी धुमाकूळ घालत तब्बल पाच एकर तूर पिकाचे मोठे नुकसान केले. काही दिवसांपासून सातत्याने रानटी जनावरे शेतात घुसत असल्याने उभे पीक उद्ध्वस्त होत असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरत आहे.
यंदा पावसाचे अनिश्चित वातावरण, वाढलेला शेतीचा खर्च आणि उत्पादनाबाबतची चिंता यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. त्यातच रानटी जनावरांकडून होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक शेतकऱ्यांनी रात्री शेतात मुक्काम करून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, तरीही रानटी डुकरांचा उपद्रव कमी होत नसल्याची व्यथा त्यांनी व्यक्त केली.
याप्रकरणी अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालयाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, तसेच रानटी डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तालुका संघटक विनोद कोते यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे सावळदबारा परिसरातील वाढता रानटी जनावरांचा उपद्रव रोखण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.






