सिल्लोड प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या दुष्परिणामांसह महिला संरक्षण कायद्यांची सविस्तर माहिती; व्यसनमुक्त समाज घडविण्याचे आवाहनयशवंत चव्हाण महाविद्यालयात अमली पदार्थ व महिला कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न
सिल्लोड येथील यशवंत चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच महिला व मुलींच्या कायदेशीर हक्कांबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने एक दिवसीय अमली पदार्थ व महिला कायदेविषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित सर होते. यावेळी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, महिला तक्रार निवारण कक्षाचे विशाल पाईकराव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अमली पदार्थ विरोधी शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर खंडागळे, संजय घुगे, कल्पना बनकर मॅडम तसेच राजेंद्र आगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी सध्या युवकांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. ड्रग्ज, गांजा, चरस, हेरॉईन, नशेच्या गोळ्या, नशेची इंजेक्शने तसेच इतर मादक पदार्थांचे सेवन केल्याने होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगण्यात आले. व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य, शिक्षण, कुटुंब आणि भविष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी महिला तक्रार निवारण कक्षाचे विशाल पाईकराव यांनी महिला व मुलींच्या संरक्षणासाठी अस्तित्वात असलेले विविध कायदे, महिला हेल्पलाईन, सायबर गुन्हे, लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया याबाबत विद्यार्थिनींना सविस्तर माहिती दिली. कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन विशाल पाईकराव यांनी केले.
पोलीस उपनिरीक्षक मनोहर खंडागळे यांनी अमली पदार्थांची विक्री, साठवणूक व सेवन करणे हा गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाते, असे स्पष्ट केले. युवकांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त समाज घडविण्याची तसेच महिला सन्मान आणि सुरक्षिततेसाठी सदैव जागरूक राहण्याची शपथ घेतली. उपस्थित मान्यवरांनी अशा जनजागृती उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता वाढून समाजात सकारात्मक बदल घडण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.






