सोयगाव प्रतिनिधी अलका चव्हाण
परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; कर्मचारी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग;मनीष जवळीकर
सोयगाव;महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त परिवहन मंत्री मा. प्रतापजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून “हरित महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र” या उद्देशाने सोयगाव आगाराच्या आगार प्रमुख मनीष जवळीकर यांच्या वतीने मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ रोजी आगार परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात आमखेडा येथील मा. सरपंच सौ. आगे मॅडम यांच्या शुभहस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि हरित परिसर निर्मितीसाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
कार्यक्रमास सोयगाव आगार प्रमुख श्री. मनीष जवळेकर, स्थानक वाहतूक निरीक्षक कैलास बागुल, वरिष्ठ लिपिक सतीश पाटील, विनोद जाधव, वर्जन जाधव, अशोक तायडे, संतोष पाखरे, मधुकर आमटे यांच्यासह चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आगार परिसरात विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता न राहता त्यांचे संगोपन करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारावी, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन सोयगाव आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक शपथ घेत पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदविला. रा.प. महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत आगार प्रशासनाचे कौतुक केले.






