Home / Uncategorized / एमआयडीसी पैठण पोलिसांचा दणका! ६ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड; ७ जणांच्या टोळीला जेरबंद..

एमआयडीसी पैठण पोलिसांचा दणका! ६ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड; ७ जणांच्या टोळीला जेरबंद..

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत

सपोनि भरत मोरे यांची मोठी कारवाई; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त, मोटारसायकल चोरीच्या साखळीचा पर्दाफाश

पैठण : एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत सपोनि भरत मोरे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. तब्बल ६ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणत ७ आरोपींच्या टोळीला जेरबंद करण्यात आले असून, सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे मोटारसायकल चोरट्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, इतर चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ११२/२०२६, कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत फिर्यादी पांडुरंग श्रीकिसन वीर (रा. वाहेगाव, ता. पैठण) यांची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (क्र. MH-20 AP-2056) ही मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस निरीक्षक भरत मोरे यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत आरोपींचा माग काढला.

तांत्रिक तपास, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आबासाहेब फुलचंद खुणे, चेतन दत्तात्रय ढगारे, जीवन सोमनाथ गिहे, महेश कैलास लहाळे, सागर मारोती जाधव, समीर आयुब शेख आणि शुभम लक्ष्मण गुंड या सात आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत आरोपींनी मोटारसायकल चोरीची कबुली दिल्यानंतर चोरीच्या वाहनांची संपूर्ण साखळीच पोलिसांसमोर उघड झाली.

या कारवाईत हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, रॉयल एनफिल्ड बुलेट, बजाज प्लॅटिना, हिरो स्प्लेंडर तसेच बजाज पल्सरसह एकूण ६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेल्या वाहनांची अंदाजे किंमत ३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की, मोटारसायकल चोरीचे गुन्हे केवळ वाहन हस्तगत करण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यामागील संपूर्ण गुन्हेगारी साखळी उध्वस्त करणे हे ग्रामीण पोलिसांचे उद्दिष्ट आहे. अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करून आरोपींना कायद्याचा धाक दाखविण्याचे काम सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सपोनि भरत मोरे यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईमुळे एमआयडीसी पैठण पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, मोटारसायकल चोरट्यांच्या टोळ्यांना हा जबरदस्त दणका मानला जात आहे. स्थानिक नागरिकांनीही पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार