Home / Uncategorized / अ.ब.क.ड. उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी सिल्लोडमध्ये आज जनआक्रोश महामोर्चा..

अ.ब.क.ड. उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी सिल्लोडमध्ये आज जनआक्रोश महामोर्चा..

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

हिंदू खाटीक समाजाचे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शांताराम खराटे यांनी केले आहे 

सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जातींमधील अ.ब.क.ड. उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू खाटीक समाजाच्या वतीने सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सिल्लोड येथे भव्य जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन हिंदू खाटीक समाज संघटनेचे युवा अध्यक्ष शांताराम खराटे (सावळदबारा) यांनी केले आहे.

या जनआक्रोश महामोर्चाची सुरुवात सकाळी १० वाजता सिल्लोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून होणार असून, त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी (एसडीएम) कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चादरम्यान शासनाच्या धोरणाविरोधात निषेध व्यक्त करण्यात येणार असून, समाजाच्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले जाणार आहे.

अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणामुळे समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत ही भूमिका शासनाने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. संविधानिक हक्कांचे संरक्षण, सामाजिक न्याय आणि सर्व घटकांना समान संधी मिळावी, या उद्देशाने हा जनआक्रोश महामोर्चा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

मोर्चात जिल्हाभरातील तसेच तालुक्यातील विविध गावांतील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा पार पाडण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या आंदोलनासाठी हिंदू खाटीक समाज संघटना, जिल्हा छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष लक्ष्मणराव कल्याणकर, उपाध्यक्ष शिवाजी रावळकर, युवा अध्यक्ष शांताराम खराटे तसेच सकल हिंदू खाटीक समाज बांधव यांनी समाजातील सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार