छत्रपती संभाजीनगर गोकुळसिंग राजपूत
ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी व नोकरदारांची गैरसोयसाठी सुरू होणार
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) यांच्या बससेवेचा विस्तार करून नाशिक-सिन्नर मार्गावरील बस फेऱ्या बारागाव पिंपरीपर्यंत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोसावी यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मनीषा खत्री (आयएएस) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या नाशिक सिटीलिंक बस सेवा सिन्नरपर्यंत नियमितपणे सुरू असून अनेक बस सिन्नर-बारागाव पिंपरी मार्गावरील कानडी मळा (खडक पॉईंट) येथे थांबतात. मात्र बारागाव पिंपरी हे गाव त्या ठिकाणापासून सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असल्याने ग्रामस्थांना वाहतुकीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. बससेवा थेट बारागाव पिंपरीपर्यंत उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी अतिरिक्त खर्च आणि वेळ वाया जात आहे.
बारागाव पिंपरीसह सुळेवाडी, पाटपिंपरी, निमगाव, गुळवंच व परिसरातील हजारो नागरिक शिक्षण, नोकरी, व्यवसाय, आरोग्य सेवा तसेच शासकीय कामांसाठी दररोज सिन्नर व नाशिक येथे प्रवास करतात. विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालये व स्पर्धा परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे नोकरदार, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनाही नियमित प्रवासासाठी योग्य सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने गैरसोय सहन करावी लागत आहे.
दत्तात्रय गोसावी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सिटीलिंक बस सेवा बारागाव पिंपरीपर्यंत वाढविल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, किफायतशीर व नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील दळणवळण अधिक सक्षम होऊन सामाजिक व आर्थिक विकासालाही चालना मिळेल.
नाशिक महानगर परिवहन महामंडळाने प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन नाशिक-सिन्नर-बारागाव पिंपरी या मार्गावर नियमित बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी दत्तात्रय रामचंद्र गोसावी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.या मागणीला प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर निर्णय घेईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.






