छत्रपती संभाजीनगर गोकुळसिंग राजपूत
मुर्ती येथे खरीप मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; दशपर्णी अर्क निर्मितीचे थेट प्रात्यक्षिक
सोयगाव तालुक्यातील मुर्ती, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने मुर्ती येथे खरीप मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आली. ‘आत्मा’ योजनेअंतर्गत आयोजित या मोहिमेत गावातील शेतकरी गटाला नैसर्गिक व शाश्वत शेतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः दशपर्णी अर्क तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान कृषी तज्ञांनी खरीप हंगामात पिकांचे योग्य नियोजन, खर्चात बचत आणि उत्पादनवाढ यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबतच नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल महाजन यांनी रासायनिक खतांच्या संतुलित वापराचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अवाजवी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता कमी होते, उत्पादन खर्च वाढतो आणि दीर्घकालीन दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मृदा परीक्षणाच्या आधारेच खतांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच ‘आत्मा’ योजनेचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी शेतकऱ्यांना दशपर्णी अर्क तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवून दिली. विविध वनस्पतींच्या पानांपासून तयार होणारा हा अर्क पिकांवरील किडींचे नियंत्रण करण्यासाठी प्रभावी ठरतो. रासायनिक किटकनाशकांच्या तुलनेत हा पर्यावरणपूरक, कमी खर्चिक आणि आरोग्यासाठी सुरक्षित पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नैसर्गिक शेतीचा स्वीकार वाढविण्यासाठी दशपर्णी अर्क उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. खरीप पिकांच्या पेरणीपूर्वी बियाणांवर योग्य औषधे व जैविक खतांची प्रक्रिया केल्यास उगवण क्षमता वाढते, सुरुवातीच्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि पिकांची वाढ जोमदार होते, असे त्यांनी सांगितले. यासोबतच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले.
या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे शेतकरी गटाचा उत्स्फूर्त सहभाग होय. शेतकरी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दशपर्णी अर्क तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी झाल्या. नैसर्गिक शेतीबाबत दाखविलेला हा उत्साह आगामी काळात गावात सेंद्रिय व शाश्वत शेतीच्या प्रसारासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक तांत्रिक माहिती मिळाली असून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचा आत्मविश्वासही प्राप्त झाला आहे. गावातील शेतकरी गटाने अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची मागणी यावेळी केली.






