चिखली न्यूज हेड : उमा प्रशांत जैवाळ

दि. २८ फेब्रुवारी २०२६ : , जिल्हा बुलढाणा येथील प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ यांच्या सेवापूर्ती निमित्ताने आज विद्यालयात अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, कर्मचारीवर्ग व छात्र-अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रा. डॉ. एस. पी. पाढेन सर होते. मंचावर सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ व सौ. सरस्वतीबाई वायाळ उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून श्री आर. यू. शिंगणे सर व श्री माळोदे सर यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. यू. वायभासे यांनी करताना प्राचार्य डॉ. वायाळ यांच्या शिक्षण, प्रशासन व संस्थेच्या विकासातील भरीव योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. सेवापूर्ती निमित्त छात्र-अध्यापक सिद्धेश्वर इंगळे, ज्ञानेश्वरी ठेंग व प्रतीक्षा पेटकर यांनी सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच नवनियुक्त प्रा. शरद इंगळे व प्रा. अर्चना खरात यांनी आपल्या मनोगतातून सरांचे मार्गदर्शन आणि प्रेरणादायी नेतृत्व अधोरेखित केले. प्रमुख अतिथी श्री आर. यू. शिंगणे यांनी आपल्या मनोगतात प्राचार्य डॉ. वायाळ यांच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मकता, दांडगा जनसंपर्क, समाजकारण व राजकारणातील जाण तसेच ज्ञानलालसा यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. संजय पाढेन यांनी वायाळ सरांच्या सेवाकाळातील विविध पैलू, संस्थाविकासासाठी केलेले कार्य व दिलेले मार्गदर्शन यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ व सौ. सरस्वतीबाई वायाळ या दांपत्याचा शाल, श्रीफळ, साडी-चोळी, पुष्पगुच्छ तसेच साडेचार फूट लांबीच्या गुलाबहाराने सत्कार करण्यात आला. तसेच यांचा मेटलचा अर्धपुतळा भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीही शाल व श्रीफळ देऊन सरांचा यथोचित गौरव केला.
दरम्यान, प्रा. डॉ. एस. पी. पाढेन यांच्या संकल्पनेतून व प्रा. डॉ. रामदास वायभासे यांनी शब्दबद्ध केलेली, श्री राहुल पवार (विशाखा स्टुडिओ, चिखली) निर्मित प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ यांच्या जीवनावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. याशिवाय माजी आमदार मा. राहुलभाऊ बोंद्रे, प्रा डॉ प्रशम कोल्हे सर, मा. नरूभाऊ खेडेकर, डॉ. वानखेडे, श्री निकाळजे, माजी प्राचार्य श्री सुधाकर काळवाघे व श्री माळोदे सर यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे वायाळ सरांच्या कार्याचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. वायाळ यांनी सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल सर्व प्राध्यापक, कर्मचारी व छात्र-अध्यापकांचे मनःपूर्वक आभार मानले. आपल्या सेवाकाळात बी.ए., बी.एड.,यामध्ये चांगल्या मित्राचा तर एम.एड., SET व Ph.D. या शैक्षणिक टप्प्यांपर्यंत पोहोचताना प्रा. डॉ. संजय पाढेन व प्रा. डॉ. रामदास वायभासे यांचे मिळालेले सहकार्य विशेषत्वाने अधोरेखित केले. तसेच उर्वरित आयुष्य व्यापक जनहितासाठी कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्र-अध्यापक क्षितिजा विजय हिवराळे व प्राजक्ता प्रशांत खरात यांनी प्रभावीपणे केले. आभार प्रदर्शन छात्र-अध्यापक शितल रामदास ताठे व गौरी रामदास ढोमणे यांनी संयुक्तरीत्या व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता छात्र-अध्यापकांनी आयोजित केलेल्या सहभोजनाने झाली. प्राचार्य डॉ. पी. एस. वायाळ यांच्या सेवापूर्ती सोहळ्याने उपस्थितांच्या मनात कृतज्ञता, अभिमान आणि प्रेरणेची भावना जागवली.






