जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर, ता. जामनेर : आजच्या काळात तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत असल्याची चर्चा सातत्याने होत असताना, पहूर येथील दोन भावांनी आपल्या कर्तृत्वाने आणि जिद्दीने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. भावाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी होमगार्ड असलेल्या भावाने तब्बल ५४ किलोमीटर अंतर न थांबता धावत पार करत शिरसाळा येथील मारुतीरायांचे दर्शन घेत आपला संकल्प पूर्ण केला.
पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले हितेश सोपान जाधव यांची देशातील प्रतिष्ठित संशोधन संस्था असलेल्या Council of Scientific and Industrial Research (CSIR) (सीएसआयआर) मध्ये तंत्रज्ञ पदावर निवड झाली आहे. हितेश यांच्या या यशामुळे जाधव कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भावाच्या या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे मोठे बंधू तथा होमगार्ड जवान सूर्यकांत सोपान जाधव यांनी शिरसाळा येथील मारुतीरायांचे दर्शन घेण्याचा संकल्प केला होता.
संकल्पपूर्तीसाठी सूर्यकांत जाधव यांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पहूर येथून धावण्यास सुरुवात केली. रात्री १ वाजता प्रारंभ झालेल्या या धावप्रवासात त्यांनी अत्यंत चिकाटी, शारीरिक क्षमता आणि मानसिक ताकदीचे दर्शन घडविले. मार्गात कुठेही विश्रांती न घेता आणि न थांबता त्यांनी सलग धावत तब्बल ५४ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. अवघ्या साडेपाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर शनिवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांनी शिरसाळा येथील मारुती मंदिर गाठले.
मंदिरात पोहोचल्यानंतर सूर्यकांत जाधव यांनी मारुतीरायांचे दर्शन घेत भावाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी प्रार्थना केली आणि आपली मनोकामना पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमाची परिसरात मोठी चर्चा होत असून अनेकांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले आहे.
भावाच्या यशाचा आनंद श्रद्धा, परिश्रम आणि समर्पणाच्या माध्यमातून व्यक्त करणाऱ्या सूर्यकांत जाधव यांच्या या कृतीने युवकांसमोर एक सकारात्मक संदेश दिला आहे. यावेळी शुभम हिरे, आकाश घोंगडे,अमोल क्षीरसागर यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता. त्यांच्या उपस्थितीत मनोकामना पूर्ततेचा हा सोहळा उत्साहात पार पडला.
पहूर कसबे येथील स्वर्गीय कीर्तनकार जनार्दन स्वामी महाराज यांचे हितेश आणि सूर्यकांत हे नातू असून त्यांना आजोबांकडून हा संस्कारांचा वारसा लाभला आहे.
सूर्यकांत जाधव यांची ही नॉनस्टॉप धाव केवळ एका संकल्पाची पूर्तता नसून, भावाबद्दलचे प्रेम, कुटुंबातील एकोप्याची भावना आणि दृढ इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.






