छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खांडापूरकर यांचे पदाधिकाऱ्यांना सखोल मार्गदर्शन; नियुक्तीच्या ठिकाणी वास्तव्यास नसणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात जनआंदोलनाचा इशारा
छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मराठवाडा विभागीय आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. भ्रष्टाचाराविरोधात निर्भीडपणे लढणाऱ्या या संघटनेची बैठक दि. २० मे २०२६ रोजी शहरातील सुभेदारी विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खांडापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत संघटनेच्या आगामी कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच मराठवाडा विभागात संघटना अधिक बळकट करण्यासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खांडापूरकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना भ्रष्टाचाराविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले की, ग्रामीण भागात अनेक तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक व इतर शासकीय कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी वास्तव्यास राहत नसल्यामुळे सामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना कामासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो तसेच वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. अशा निष्काळजी कर्मचाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून जाब विचारला जाणार असून त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी वास्तव्यास राहण्यास भाग पाडण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत संघटनेचे ध्येय, धोरणे, संघटनात्मक विस्तार, जनहिताचे प्रश्न, भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमा तसेच आगामी आंदोलनांची दिशा यावरही सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील समस्या मांडून संघटनेच्या माध्यमातून जनतेसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी संघटनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. दीपक गांधाळे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बैठकीस राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खांडापूरकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पृथ्वीराजसिंह पाटील, राष्ट्रीय संघटक अरुण देशमुख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, राष्ट्रीय महिला प्रदेशाध्यक्ष राणीलाई स्वामी, महाराष्ट्र मीडिया प्रभारी शिवकुमार काळे, मराठवाडा मीडिया प्रभारी दुर्गादास अपार, दादासाहेब काळे, प्रदीप जगताप, जिल्हाध्यक्ष संभाजीनगर, महिला जिल्हाध्यक्ष पायलताई बुलबुले, जिल्हा उपाध्यक्ष कल्पनाताई जमदाडे, लताताई त्रिवेदी, संघटक संदीप शिंदे, सुनील वैद्य यांच्यासह विविध जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी संघटना अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मराठवाडा विभागात संघटना अधिक सक्षम करून सामान्य नागरिकांच्या न्यायहक्कासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.






