Home / Uncategorized / सावळदबारात डिझेल टंचाईचा गंभीर परिणाम; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा…

सावळदबारात डिझेल टंचाईचा गंभीर परिणाम; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबलचक रांगा…

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत

शेतकरी, वाहनधारक हवालदिल; शेतीची कामे ठप्प होण्याची भीती, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा व परिसरात सध्या डिझेल टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली असून पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दि.२० मे २०२६ रोजी दिवसभर पाहायला मिळाले. मागील दोन दिवसांपासून डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने सावळदबारा, देऊळगाव गुजरी, फत्तेपूर, धामणगाव बढे आदी परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सावळदबारा येथील कोलते पाटील पेट्रोल पंपावर पहाटेपासूनच वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

डिझेल मिळवण्यासाठी ट्रॅक्टर, मालवाहू वाहने, खासगी चारचाकी, दुचाकी तसेच शेतीसाठी वापरली जाणारी विविध यंत्रसामग्री घेऊन शेतकरी आणि वाहनधारक मोठ्या प्रमाणात पंपांवर दाखल होत आहेत. काही ठिकाणी रांगा मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचल्याने वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू असल्याने शेतकऱ्यांना डिझेल टंचाईचा सर्वाधिक फटका बसत आहे. ट्रॅक्टर, पंपसेट, फवारणी यंत्रे तसेच शेती मशागतीसाठी डिझेल अत्यावश्यक असताना वेळेवर इंधन उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक शेतकरी पहाटेपासून रांगेत उभे राहत असून तासन्तास प्रतीक्षा करूनही काहींना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

गावातील काही पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा संपल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. डिझेल केव्हा उपलब्ध होणार याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने वाहनधारकांची धावपळ वाढली आहे. काही ठिकाणी रांगेत घुसण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे.

वाहनांच्या वाढत्या रांगांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून व्यापारी, मालवाहतूकदार तसेच सावळदबारा ग्रामीण भागातील प्रवाशांनाही त्याचा फटका बसत आहे. डिझेल अभावी मालवाहतूक उशिरा होत असल्याने बाजारपेठेवरही परिणाम जाणवू लागला आहे.

दरम्यान, संबंधित विभागाकडून डिझेल पुरवठा सुरळीत करण्यासाठी पंप मालक भाऊराव कोलते पाटील यांच्या कडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत असली तरी प्रत्यक्षात नागरिकांना अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. वेळेवर इंधन उपलब्ध झाले नाही तर शेतीची कामे खोळंबून आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून डिझेल पुरवठा नियमित करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार