क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ मांसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज (स्मृतिदिन), वीर महाराणा प्रताप, राष्ट्रसंत गाडगेबाबा तसेच स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या संयुक्त सार्वत्रिक जयंती सोहळ्यानिमित्त आज दि. 14 मे 2026 रोजी युद्धभूमी आसई येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जुई फाउंडेशन, शंभूराजे फाउंडेशन, मोरिया गणेश उत्सव मंडळ, फुले-शाहू-आंबेडकर उत्सव समिती व युद्धभूमी आसई ग्रामस्थ यांच्या संयुक्त पुढाकारातून हा भव्य सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, नव्याने शासकीय सेवेत निवड झालेल्यांचा गौरव, तसेच शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्यांचा सेवा गौरव करण्यात आला. याशिवाय रमेश गिरी नांदेडकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच युद्धभूमी आसई गावातील एका व्यक्तीस “आसई भूषण पुरस्कार” प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, गावातील मतभेद दूर करून एकोपा निर्माण करणे, गरजूंना मदत करणे, प्रामाणिकपणा व दूरदृष्टीने कार्य करणे अशा विविध गुणांची दखल घेत जुई फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकमताने मा. श्री. विलास प्रकाशराव इंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मा. विलास पाटील इंगळे यांना “आसई भूषण पुरस्कार 2026” मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

गावाचा “भूषण” पुरस्कार मिळवणे हे अत्यंत कठीण आणि अभिमानास्पद मानले जाते. एक वेळ राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळणे सोपे असू शकते, परंतु गावपातळीवर सर्व समाजाचा विश्वास संपादन करून “गाव भूषण” म्हणून गौरव मिळवणे म्हणजे खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात स्थान निर्माण करणे होय. कोणतेही राजकारण न करता, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन चालणे, गावातील प्रत्येक व्यक्तीशी आत्मीयतेचे संबंध ठेवणे, सुख-दुःखात धावून जाणे आणि समाजहिताला नेहमी प्राधान्य देणे, हेच अशा सन्मानामागचे खरे कारण असते.
यावेळी नांदेडचे ज्येष्ठ शाहीर मा. रमेशजी गिरी यांच्या हस्ते मा. विलास पाटील इंगळे यांना शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष आर. एन. इंगळे, डॉ. कैलास इंगळे, डॉ. समाधान इंगळे, तुळशीदास लोखंडे, सरपंच विजय इंगळे, उपसरपंच दत्ता कोरडे, चेअरमन नारायण इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्काराला उत्तर देताना मा. विलास पाटील इंगळे भावूक झाले. ते म्हणाले, “हा पुरस्कार माझ्यासाठी जीवन गौरव पुरस्कारापेक्षाही मोठा आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमीतून मिळालेला हा सन्मान माझी जबाबदारी आणखी वाढवणारा आहे. जुई फाउंडेशन व ग्रामस्थांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही तुटू देणार नाही. आपण दिलेल्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी भारावून गेलो आहे.”
या कार्यक्रमास फाउंडेशनचे पदाधिकारी, ग्रामस्थ, बालगोपाळ, विविध क्षेत्रातील कलाकार, मान्यवर महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.






