छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
मान्यवरांच्या उपस्थितीत सावळदबारात भव्य सोहळा; शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल प्राचार्य कोलते यांचा सत्कार

पुतळा अनावरण व प्राचार्य कोलते सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे जय कालंकादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ कै. लक्ष्मणराव भिमराव कोलते पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण (पंजाबराव) रायभान कोलते पाटील यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचा भव्य कार्यक्रम दि.१५/५/२६ शुक्रवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्यास राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती. सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेल्या कार्यक्रमात ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. लक्ष्मणराव भिमराव कोलते पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिसजी मुलतानी व मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिक्षण क्षेत्रात कै.लक्ष्मण कोलते पाटील यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव यावेळी वक्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
यानंतर प्राचार्य नारायण (पंजाबराव) कोलते पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त विशेष सत्कार समारंभ पार पडला. संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कोलते पाटील व सचिव सौ. रत्नाताई कोलते पाटील यांनी प्रभारी प्राचार्य म्हणून जीवन कोलते पाटील यांची नियुक्ती जाहीर करत त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या प्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार विक्रम काळे, भाजपा प्रदेश चिटणीस सुरेश बनकर, भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, सिद्धेश्वर सहकारी कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोटे, विविध शिक्षण अधिकारी, सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम महारु चव्हाण,मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, पत्रकार बांधव,सामाजिक कार्यकर्ते व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत प्राचार्य नारायण कोलते पाटील यांच्या दीर्घ शैक्षणिक सेवेला उजाळा दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ यांच्या कडून व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.अशी माहिती प्राचार्य जीवन आबाराव कोलते पाटील यांनी बोलताना सांगितले आहे






