छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत
महाराष्ट्रात प्रतिबंधित पान मसाला वाहतूक करणारा आरोपी जेरबंद
सिल्लोड-कन्नड मार्गावर सापळा रचून कारवाई; वाहनासह गुटखा जप्त
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा वाहतूक करणाऱ्या आरोपीस वाहनासह जेरबंद केले. या कारवाईत सुमारे २२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ७ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक पांढऱ्या रंगाची Kia Seltos (क्रमांक MH-20 FP-2824) या वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पान मसाला व गुटखा सिल्लोडमार्गे कन्नडकडे विक्रीसाठी नेण्यात येणार आहे.
सदर माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक श्री. विनय अशोक सोनवणे व पोलीस उपअधीक्षक श्रीमती आरती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले. अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी श्री. सिद्दीकी यांना देखील या कारवाईत सहभागी करून घेण्यात आले.
सकाळी सुमारे ९ वाजेच्या सुमारास सिल्लोड-कन्नड रोडवरील मौजे बोरगाव फाटा येथील पूर्णा नदी पुलाजवळ पोलिसांनी सापळा रचला. काही वेळातच संशयित Kia Seltos वाहन तेथे येताना दिसताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. वाहन चालकाने आपले नाव गणेश नानासाहेब काकडे (वय ३३, रा. रांजनगाव शेनपुंजी, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.
पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने हा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला बाहेर राज्यातून आणून चोरट्या पद्धतीने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली.
या कारवाईत अंदाजे ७ लाख ८०० रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा तसेच अंदाजे १५ लाख रुपये किंमतीची Kia Seltos कार असा एकूण २२ लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपी गणेश काकडे याच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत कलम ५९ तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोनि विजयसिंह राजपूत, पोउपनि महेश घुगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.






