Home / Uncategorized / छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पारगाव सिरस येथे उत्साहात संपन्न…

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान पारगाव सिरस येथे उत्साहात संपन्न…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत 

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शेकडो लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप

बीड ; शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पारगाव सिरस येथे १० एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले . पारगाव सिरस येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृह पारगाव सिरस येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये शेतकरी , ग्रामस्थ , महिला बचत गट , विद्यार्थी तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेतला .

राज्य शासनाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख , पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे महाराजस्व अभियान सुरू केले आहे . नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देणे , प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पारगाव सिरस येथे आयोजित शिबिराने या उद्दिष्टांना प्रत्यक्ष स्वरूप दिले असल्याचे चित्र पाहायला मिळाले .

या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते . कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन शैलेश सूर्यवंशी , तहसीलदार चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सुरेंद्र डोके, नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले .

कार्यक्रमास महसूल मंडळातील आजी माजी सरपंच तसेच महसूल विभागातील व इतर विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठी मंडळ अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम आंधळे , महादेव चौरे , दादासाहेब शेळके तसेच बीड तालुक्यातील सर्व महसूल मंडळ अधिकारी , ग्राम महसूल अधिकारी , महसूल सेवक आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते .

पारगाव सिरस महसूल मंडळातील १३ गावचे सरपंच , उपसरपंच , पोलीस पाटील , ग्रामपंचायत सदस्य , माजी जिल्हा परिषद सदस्य , माजी पंचायत समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, महसूल सेवक, महावितरण चे कर्मचारी,आरोग्य अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका, आशा सेविका,तसेच महिला बचत गट , शेतकरी गट , विद्यार्थी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले . नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला लोकाभिमुख स्वरूप प्राप्त झाले .

या शिबिराच्या माध्यमातून विविध विभागांचे माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले होते . महसूल विभागाशी संबंधित जमीन नोंदणी , खातेफोड , वारस नोंद , सातबारा उतारे , विविध दाखले व प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली . नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले .

शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना देण्यात आला . यामध्ये जिवंत सातबारा ( मयत खातेदार कमी करणे ) , डिजिटल सातबारा वाटप , वारस फेरफार , वर्ग – २ चे वर्ग –१ मध्ये रूपांतर , ई – पिक पाहणी , ॲग्रीस्टॅक नोंदणी , ई – वसुली पावती , सेवामित्र प्रमाणपत्र , प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र , पानंद रस्ते योजना , रस्त्यांच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर घेणे , ई – केवायसी प्रक्रिया , आधार कॅम्प , ई – शिधापत्रिका वाटप , लक्ष्मी मुक्ती योजना लाभ , रक्तदान शिबिर , अभिलेख दुरुस्ती , मोफत आरोग्य तपासणी , घरकुल मंजुरी आदेश , गायरान मंजुरी आदेश तसेच मागेल त्याला शेततळे योजना याबाबत नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली .

या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध सेवा नागरिकांना देण्यात आल्या . त्यामध्ये डिजिटल सातबारा उताऱ्यांचे वाटप करण्यात आले . तसेच डिजिटल शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले . महसूल विभागाशी संबंधित ४२ फेरफार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला . विविध योजनां अंतर्गत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले . तसेच नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली .

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांसाठी या शिबिरात विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती . लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र ऑनलाईन करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे अनेक वृद्ध नागरिकांना मोठा दिलासा मिळाला .

या शिबिरामुळे महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले . अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रशासनाशी थेट संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या . अधिकाऱ्यांनी त्या समस्यांवर मार्गदर्शन करून काही प्रकरणे जागेवरच निकाली काढली . त्यामुळे नागरिकांना तालुका कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासली नाही .

यावेळी बोलताना उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार श चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार सुरेंद्र डोके, नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांनी नमूद केले की महाराष्ट्र शासनामार्फत ही अत्यंत महत्त्वाची योजना नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे . प्रशासनाकडून नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात येईल .

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले . प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होण्यासाठी अशा शिबिरांचे मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले . छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या विचारांप्रमाणे शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले .

या शिबिराच्या यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळ अधिकारी स्मिता गुंजाळ तसेच ग्राम महसूल अधिकारी विजयकुमार बहिर, विलास शिंदे, उत्तरेश्वर खांडे, यशवंत सानप , व स्वाती घुगे यांनी पुरेपूर प्रयत्न केले .

एकूणच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे शिबिर प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे प्रभावी उदाहरण ठरले . नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद , विविध विभागांचा समन्वय आणि प्रशासनाची तत्परता यामुळे हे शिबिर यशस्वीपणे पार पडले . शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची शिबिरे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली . कार्यक्रमाचा शेवटी श्रीकांत नाना नवले उपसरपंच पारगाव सिरस यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार