छत्रपती संभाजी नगर जिल्हा प्रतिनिधी श्रीपत पवार
पैठण तालुक्यातील लिंबगाव येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. पायल गौतम वाव्हळ हिची पुणे शहर पोलीस दलात निवड झाल्यानंतर ( दि.८) रोजी गावकऱ्यांनी तिचे जंगी मिरवणूक काढून स्वागत केले आहे.
पायलचे वडील रिक्षा चालक असून, अत्यंत साध्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा निर्धार केला. घरची आर्थिक परिस्थिती मर्यादित असतानाही पायलने कधीही हार मानली नाही. तिची आई शेतीमजुरी करत कुटुंबाला हातभार लावत होती. दोन एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असताना पायलने शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली.
पायलने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, लिंबगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर तिने पाचोड येथील जवाहर विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे तिने उच्च शिक्षणासाठी बी.सी.ए पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असताना तिने पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक व लेखी परीक्षेची तयारी सातत्याने केली. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि कुटुंबाच्या पाठबळामुळे पायलने अखेर पुणे शहर पोलीस दलात स्थान मिळवले. तिच्या या यशामुळे गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तिचे कौतुक केले आहे. “मुलींनी मोठे स्वप्न पाहावे आणि त्यासाठी मेहनत करावी,” असा संदेश पायलच्या यशातून मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पायलच्या कुटुंबात भाऊ यशपाल वाव्हळ, जय वाव्हळ आणि हे शिक्षण घेत असून, बहिणीच्या यशामुळे त्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने तिच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.
ग्रामीण भागातील मुलींसाठी पायल वाव्हळ ही प्रेरणादायी ठरली आहे.
चौकट- पायलने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या कष्टांना आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि जिद्द असेल तर यश नक्की मिळते,” असे मत तिने व्यक्त केले






