छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत
पाणी, वीज व आरोग्य प्रश्नांवर निर्णय मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे अधिकाऱ्यांना तातडीच्या अंमलबजावणीचे आदेश
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर जिल्हा परिषद सर्कलमधील विविध विकासकामांसंदर्भात मंगळवार, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथील मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पाणीपुरवठा, ऊर्जा व आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.
या बैठकीत फर्दापूर सर्कलमधील पाणीटंचाई, वीजपुरवठा आणि आरोग्य सुविधांबाबतचे प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. विशेषतः नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची तातडीने पूर्तता, तसेच सावळदबारा व परिसरात 33 केव्ही उच्च दाबाच्या वीज लाईन व उपकेंद्रांच्या कामांना गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
तसेच ओव्हरलोड डी.पी.च्या ठिकाणी नवीन डी.पी. मंजूर करणे, रवळा-जवळा व पळासखेडा येथे उपकेंद्रांची कामे सुरू करणे, आणि फर्दापूर, सावळदबारा, पिंपळा येथे आरोग्य उपकेंद्र इमारती व निवासस्थाने मंजूर करण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आले. सावरखेडा-रेनापूर भागाला सिल्लोड तालुक्यातील ग्रीड पाणीपुरवठा योजनेतून पाणी देण्याचाही विषय चर्चेत आला.
बैठकीत इद्रिसजी मुलतानी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे या प्रश्नांना गती मिळाल्याचे स्पष्ट झाले. मंत्री बोर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच फर्दापूर येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी वीज वितरण विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सावळदबारा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना सुचवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच मे महिन्यात स्वतः सोयगाव तालुक्यातील योजनांची पाहणी करणार असल्याचे मंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.
या बैठकीस पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण, सदस्य राहुल राठोड, माजी सभापती जयप्रकाश चव्हाण, माजी सरपंच अज्जू भाई, तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






