छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
भाजपाचा भगवा ध्वज म्हणजे राष्ट्रसेवेचे प्रतीक : सोयगाव तालुक्यात घराघरात ध्वजारोहणाचे आवाहन
सोयगाव, सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरातील नागरिकांनी “माझा परिवार, भाजपा परिवार” या संकल्पनेला बळ देत सोमवार, दि. ६ एप्रिल २०२६ रोजी भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्याचे आवाहन सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम चव्हाण यांनी केले आहे. यानिमित्त भाजपा परिवारातील प्रत्येक सदस्याने आपल्या घरावर भाजपाचा भगवा ध्वज लावून या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करावे, असे त्यांनी नमूद केले.
उत्तम चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचा भगवा ध्वज हा केवळ पक्षाचे चिन्ह नसून तो राष्ट्रहिताच्या विचारधारेचे, राष्ट्रसेवेच्या दृढ निश्चयाचे आणि कार्यकर्त्यांच्या निःस्वार्थ समर्पणाचे प्रतीक आहे. या ध्वजामागे देशभक्ती, विकासाची दिशा आणि समाजसेवेची परंपरा दडलेली आहे.
सोयगाव तालुक्यासह सावळदबारा परिसरातील सर्व नागरिक, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक घरावर फडकणारा भगवा ध्वज हा देशप्रेम आणि एकात्मतेचा संदेश देणारा ठरेल. स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि पक्षाच्या विचारांचा प्रसार करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, भाजपा कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण तसेच गरजूंसाठी मदतकार्य यांसारखे उपक्रम राबवून स्थापना दिन अधिक अर्थपूर्ण करावा, असेही सभापती चव्हाण यांनी सुचविले. या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडूनही या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.






