Home / Uncategorized / सोयगाव तालुक्यात मोबाईल टॉवर उभारणीसाठी हालचाल वेगात…

सोयगाव तालुक्यात मोबाईल टॉवर उभारणीसाठी हालचाल वेगात…

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – गोकुळसिंग राजपूत

ईद्रीस मुलतानी यांची केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे मागणी

सोयगाव : तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल नेटवर्कच्या गंभीर समस्येमुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा प्रश्न आता केंद्र सरकारपर्यंत पोहोचला असून, लवकरच मोबाईल टॉवर उभारणीसाठी कार्यवाही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ईद्रीस मुलतानी यांनी दि. ३१ मार्च रोजी दिल्ली येथे केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन सोयगाव तालुक्यातील नेटवर्क समस्येबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

या निवेदनामध्ये जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसह मोलखेडा, महालब्धा, टीटवी, चारूमूर्ती, रवळा, ढाबा आदी गावांमध्ये मोबाईल टॉवर नसल्याने नागरिकांना कोणत्याही प्रकारची रेंज उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले. सोयगाव तालुका हा डोंगरी व दुर्गम भाग असल्याने इंटरनेट सुविधेअभावी शासकीय कामे, बँकिंग व्यवहार, आरोग्य सेवा तसेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान नागरिकांनी हीच प्रमुख मागणी मांडली होती. त्यावेळी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या अनुषंगानेच मुलतानी यांनी दानवे यांच्या शिफारस पत्रासह सिंधिया यांची भेट घेतली व दूरध्वनीद्वारेही चर्चा घडवून आणली.

यावेळी केंद्रीय मंत्री सिंधिया यांनी सोयगाव तालुक्यात ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी मोबाईल टॉवर उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, अजिंठा लेणी येथे देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतानाही मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही मुलतानी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या पर्यटनस्थळासह संपूर्ण तालुक्यात लवकरच नेटवर्क सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार