छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
अंबड तालुक्यातील महाकाळा येथे अवकाळी पावसादरम्यान विजेचा जबरदस्त कहर झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. लिंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या दोन तरुणांवर अचानक वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दि. ३० मार्च २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास महाकाळा ते साष्ट पिंपळगाव मार्गावरील नाथनगर वस्ती परिसरात घडली.
मृत तरुणांची नावे गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१) व आदित्य दगडू बेद्रे (वय २०) अशी असून ते लहाने कुटुंबातील आहेत. अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी हे तिघेही लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. मात्र याच वेळी विजेचा जोरदार कडकडाट होत झाडावर वीज कोसळली आणि क्षणार्धात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी दखल घेत संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली. बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले


दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की वादळी पाऊस व विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.






