देऊळगाव राजा : मुन्ना ठाकूर
देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये एका राजकीय व्यक्तीचा वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे.
श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव गड किल्ले ऐतिहासिक वास्तू संवर्धन प्रतिष्ठान यांच्या वतीने अतिश राजे जाधव यांनी राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरून आज बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, दिनांक ७ मार्च रोजी अंढेरा पोलीस स्टेशन येथे एका राजकीय व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्या वेळी पोलीस निरीक्षक तसेच काही पोलीस कर्मचारी उपस्थित होते, असा आरोप करण्यात आला आहे.
पोलीस ठाणे हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असलेले शासकीय ठिकाण असल्याने अशा ठिकाणी कोणत्याही राजकीय व्यक्तीचे वाढदिवस किंवा वैयक्तिक कार्यक्रम साजरे होणे योग्य नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी निर्देश द्यावेत, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.






