छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
विज बिल वसुली मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन –कार्यकारी अभियंता अविनाश राऊत
सिल्लोड : सिल्लोड, सोयगाव व सावळदबारा परिसरातील महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांनी विज बिल वसुली मोहिम यशस्वीपणे राबवून आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडावे, असे आवाहन सिल्लोड उपविभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश राऊत यांनी केले. जागतिक लाईनमन डे निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
दि. ४ मार्च रोजी महावितरण सिल्लोड यांच्या वतीने सिल्लोड येथील कार्यालयात जागतिक लाईनमन डे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता अविनाश राऊत होते. यावेळी सहायक अभियंते, कनिष्ठ अभियंता सतीश कोतवाल सावळदबारा महावितरण वीज कर्मचारी तसेच मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक लाईनमन डे निमित्त सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सर्व लाईनमन बांधवांना शुभेच्छा दिल्या. लाईनमन हा उन, वारा आणि पावसातही चोवीस तास जनतेसाठी कार्य करणारा खरा ‘विज सैनिक’ असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
यावेळी कार्यकारी अभियंता अविनाश राऊत यांच्या हस्ते सर्व लाईनमन बांधवांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी लाईनमन बांधवांना काम करताना सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे आवाहन केले. कोणतेही काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा तसेच लाईनवर काम करण्यापूर्वी आवश्यक परमिट घेऊनच काम करावे, असेही भास्कर बागड एच आर मॅनेजर यांनी स्पष्ट केले.
तांत्रिक कर्मचारी म्हणून आपला जीव सुरक्षित ठेवणे ही प्रथम जबाबदारी आहे. त्यानंतर कंपनीचे हित जपणे महत्त्वाचे आहे. कारण कंपनी टिकली तर आपण टिकणार आहोत, असे सांगत त्यांनी महावितरणच्या वसुली मोहिमेत सर्व लाईनमन व तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. महावितरणची सेवा अखंडित ठेवण्यात लाईनमन बांधवांचा मोलाचा वाटा असून तेच महावितरणचे खरे कणा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रत्येक कर्मचाऱ्याने जागरूक राहून आपल्या कुटुंबासाठी आणि कंपनीसाठी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे, असेही कार्यकारी अभियंता राऊत यांनी सांगितले. यावेळी इतर वीज कर्मचाऱ्यांनीही लाईनमन डे निमित्त आपल्या भावना व्यक्त करत लाईनमनांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाईनमन ज्ञानेश्वर घोडके यांनी केले. या कार्यक्रमाला महावितरणचे अधिकारी, लाईनमन व इतर वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






