छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
युविका संतोष राजपूत देशात १५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण
खुल्या प्रवर्गातून राष्ट्रीय यश; वैजापूरच्या कन्येचा मानाचा तुरा
आय.आय.टी. प्रवेश परीक्षेत वैजापूरची युविका संतोष राजपूत देशात १५व्या क्रमांकाने उत्तीर्ण
वैजापूर, ता.०७ :
वैजापूर येथील रहिवासी संतोष धोंडीरामसिंह राजपूत यांची कन्या युविका संतोष राजपूत हिने आय.आय.टी. मुंबईतर्फे घेण्यात आलेल्या जानेवारी २०२६ मधील राष्ट्रीय स्तरावरील डिझाईन प्रवेश परीक्षेत खुल्या प्रवर्गातून देशात १५वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अत्यंत कठीण व स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत युविकाने वैजापूर शहरासह संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे.
या राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षेसाठी देशभरातून सुमारे वीस हजार विद्यार्थी बसले होते. मात्र त्यामधून निवडक विद्यार्थ्यांनाच यश मिळते. आय.आय.टी.मधील डिझाईन अभ्यासक्रमासाठी देशभरातील आयआयटी संस्थांमध्ये मिळून केवळ २४५ जागा उपलब्ध असल्यामुळे या परीक्षेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.
या प्रवेश परीक्षेत विद्यार्थ्यांची डिझाईन क्षमता, निरीक्षण क्षमता, तार्किक विचारशक्ती, समस्या निवारण क्षमता यांसह बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान चाचणी अशा विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे ही परीक्षा अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक मानली जाते. अशा या कठीण परीक्षेत खुल्या प्रवर्गातून देशात १५वा क्रमांक मिळवत युविकाने आपल्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीची चमक दाखवून दिली आहे.
युविकाच्या या राष्ट्रीय स्तरावरील यशामुळे वैजापूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार व नातेवाईकांकडून तिचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
युविका ही सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांची नात असून लहानपणापासूनच ती अभ्यासू, जिज्ञासू व मेहनती विद्यार्थीनी म्हणून ओळखली जाते. तिच्या या यशामुळे राजपूत कुटुंबासह वैजापूर शहराचा शैक्षणिक मान उंचावला असून अनेक विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.






