जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
पहूर, ता. जामनेर :
पहूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. कॅप्टन दादासाहेब एम. आर. लेले बसस्थानक परिसरात जिल्हा सामाजिक न्याय विभागातर्फे इतर मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरकुल योजनांबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
संवेदना बहुउद्देशीय संस्था, पिंप्राळा यांच्या वतीने या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या सहकार्याने सदर संस्थेमार्फत जिल्हाभर विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये घरकुल योजनांबाबत जागृती केली जात आहे.
या पथनाट्यातून घरकुल योजनांचे महत्त्व, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. प्रभावी सादरीकरणामुळे उपस्थित नागरिकांनी पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमप्रसंगी सरपंच अबू तडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, माजी उपसरपंच शाम साबळे , जयंत जोशी, समाधान कचरे, देविदास धनगर भिका जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






