न्यूज हेड – उमा जैवाळ
२५-०२-२०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील बुलडाणा जिल्हा अंतर्गत चिखली तालुका येथील मलगी गावात अत्यंत निषेधार्ह व संतापजनक घटना घडली. काही समाजकंटकांनी पूज्य भन्ते धम्मपाल यांना धमदाटी करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. ही बाब केवळ एका व्यक्तीवरील हल्ला नसून संपूर्ण समाजाच्या स्वाभिमानावर आघात करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
घटनेला आज पाच दिवस उलटून गेले असतानाही एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच तो फोन कॉलद्वारे समाजबांधव, साक्षीदार तसेच भन्ते धम्मपाल यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधितांकडून पोलीस प्रशासनाकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
फरार आरोपीस तात्काळ अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.
साक्षीदार व भन्ते धम्मपाल यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे.
प्रकरणाची निष्पक्ष व जलदगतीने चौकशी करून दोषींवर कडक कलमांखाली गुन्हा दाखल करावा.
अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
तसेच, योग्य कारवाई न झाल्यास ऑल इंडिया पँथर सेना यांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
न्याय, समता आणि कायद्याचे राज्य अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.






