Home / Uncategorized / जिल्हा प्रमुखपदासाठी विठ्ठल बदर पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा; तळागाळातील कार्यकर्त्यांची पसंती 

जिल्हा प्रमुखपदासाठी विठ्ठल बदर पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा; तळागाळातील कार्यकर्त्यांची पसंती 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख पद सध्या रिक्त असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. या महत्त्वाच्या पदासाठी अनेक इच्छुकांनी तयारी दर्शवली असली तरी, सध्या उपजिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल बदर पाटील हे नाव सर्वाधिक चर्चेत असून, तळागाळातील कार्यकर्ते व सामान्य नागरिकांमधून त्यांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

विठ्ठल बदर पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. ते हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना या अंगीकृत संघटनेच्या स्थापने पासून ७वर्षे सिल्लोड तालुकाध्यक्ष, १२ वर्षे संभाजीनगर जिल्हाध्यक्ष आणि १२ वर्ष प्रादेशिक सचिव या पदावर कार्यरत होते. मार्च २०२४ ला उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा देऊन त्यांनी शिवसेना पक्षात प्रत्यक्ष सहभाग घेतला त्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. तेव्हा पासून सिल्लोड सोयगांव विधानसभा मतदारसंघात त्यांनी संघटन वाढीसाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. गावपातळीवर शाखा मजबूत करणे, कार्यकर्त्यांना जोडून ठेवणे, जनतेच्या अडचणी थेट वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणे, या त्यांच्या कार्यशैलीमुळे ते सामान्य जनतेत लोकप्रिय झाले आहेत.

कोरोना काळापासून ते विविध सामाजिक प्रश्नांपर्यंत, गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. अनेक शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच “जिल्हा प्रमुखपदासाठी निष्ठावंत आणि जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच संधी द्यावी,” अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विठ्ठल बदर पाटील यांनी युवक, महिला व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.

जिल्ह्यातील विविध भागांतून त्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया येत असून, “विठ्ठल बदर पाटील यांची जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यास पक्षाला नवसंजीवनी मिळेल,” असा विश्वास पदाधिकारी व नागरिक व्यक्त करत आहेत. आता वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ... Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार