छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत
सोयगाव–सावळदबारा परिसरात उत्सवाची जोरदार तयार
सोयगाव तालुक्यासह सावळदबारा परिसरात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यंदा मोठ्या धुमधडाक्यात, जल्लोषात आणि सामाजिक एकतेचा संदेश देत साजरी करावी, असे आवाहन नव्याने विजयी झालेले पंचायत समिती सभापती उत्तम चव्हाण यांनी केले आहे.
सोयगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत बोलताना उत्तम चव्हाण म्हणाले की, “शिवरायांचा विचार, त्यांची स्वराज्याची संकल्पना आणि जनतेसाठी केलेले कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जयंती केवळ औपचारिक न ठेवता प्रेरणादायी उपक्रम, सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहिमा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली पाहिजे.”
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचे संकेत देत, आगामी काळात सोयगाव तालुक्यात विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचेही सूचक वक्तव्य केले. “जनतेच्या विश्वासावर निवडून आलो असून, प्रत्येक गावात मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे,” असे सांगत त्यांनी प्रशासनालाही सहकार्य करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, सावळदबारा परिसरात जयंतीच्या तयारीला वेग आला असून विविध मंडळांकडून मिरवणूक, व्याख्याने, पोवाडे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. उत्तम चव्हाण यांच्या या आवाहनामुळे राजकीय वातावरणातही चैतन्य निर्माण झाले असून, सत्तेची पकड मजबूत करण्याच्या दिशेने त्यांची सक्रिय हालचाल सुरू असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.






