Home / Uncategorized / केबल चोरी प्रकरणी पाच संशयितांना अटक; फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई…

केबल चोरी प्रकरणी पाच संशयितांना अटक; फत्तेपूर पोलिसांची मोठी कारवाई…

जळगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

७० हजारांचा मुद्देमाल जप्त; सपोनि अंकुश जाधव यांच्या तपासामुळे शेतकऱ्यांना दिलासा 

जामनेर : जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत पंप आणि बोअरवेलच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलिसांनी कारवाई करत पाच संशयितांना अटक केली आहे. यामध्ये केबल चोरी करणाऱ्या चौघांसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या एका भंगार व्यावसायिकाचा समावेश आहे. पोलिसांनी या कारवाईत एकूण ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दहा शेतकऱ्यांच्या केबलची चोरी

फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणीसह परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या आणि बोअरवेलच्या केबल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले होते. शेतकरी आणि पोलिसांकडून रात्रीची गस्त घालण्यात येत असतानाही चोरट्यांनी चोरीचे सत्र सुरूच ठेवले होते.

४ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री चोरट्यांनी लोणी परिसरातील तब्बल दहा शेतकऱ्यांच्या शेतातील सुमारे ९७ हजार २०० रुपये किमतीच्या विद्युत केबल चोरून नेल्या. दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या चोरीमुळे मोठा आर्थिक फटका बसला.

संतप्त शेतकऱ्यांचा दोन तास रास्ता रोको

वारंवार होणाऱ्या केबल चोरीच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राज्य मार्ग क्रमांक ४४ वर सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरातील परिस्थिती गंभीर बनली होती.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नानासाहेब आगळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. चोरीच्या घटनांचा तपास करून आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यानंतर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी फत्तेपूर पोलीस ठाण्याला भेट देऊन केबल चोरीच्या प्रकरणांचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.

गुप्त माहितीच्या आधारे आरोपी जेरबंद

लोणी येथील शेतकरी गोपाल प्रल्हाद कोल्हे यांच्या फिर्यादीवरून फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३१७(२) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तोंडापूर येथील चार संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी शेतातील विद्युत केबल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये गणेश नारायण कोळी (वय २४), शाहरुख अजित तडवी (वय २८), प्रवीण धनराज गवळी (वय २५) आणि विकास गजानन जाधव (वय १९) यांचा समावेश आहे.

या चौघांनी चोरी केलेला माल सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील भंगार व्यावसायिक राजीक खान लाड खान (वय ३०) याला दिल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित भंगार व्यावसायिकालाही अटक केली.

७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे.

१० हजार रुपये किमतीचे दोन लोखंडी कटर व इतर साहित्य.

५ हजार रुपये किमतीचे पाच किलो तांबे.

४५ हजार रुपये किमतीचे विद्युत केबलमधील ४५ किलो तांबे.

२० हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी (क्रमांक एमएच-१९ ईएन-०८९३).

अशा प्रकारे एकूण ७० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर राठोड करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत केबल चोरीच्या घटनांमुळे सिंचन व्यवस्थेवर परिणाम होत होता. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, शेतमाल आणि शेतीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

तुमचे मत

माझी साइट कशी आहे?

View Results

Loading ...

लाइव टीवी

राशिफल

शेयर बाज़ार